ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे.शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा असे म्हणाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
तसेच राज्यातील सत्तांतर आणि सत्तासंघर्ष याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे ही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, असं म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंवर फडणवीसांना निशाणा साधला. तर, भाजप-शिवसेना युती आणि शिवसेनेतील बंड याबाबत बोलताना मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केलेत, असंही देवेंद्र फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपलं व्हिजन मांडण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या महाराष्ट्र सरकारनं भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याची पायाभरणी करण्याचं काम सुरु केलं आहे. विशेषतः पायाभूत सुविधांवर आधारित विकास ही जागतिक संकल्पना घेऊनच आम्ही महाराष्ट्रात पुढे जात आहोत. नागपूर-मुंबई समृद्धी एक्सप्रेस महामार्ग केवळ एक रस्ता नाही, तर इकोनॉमिक कॉरिडोअर आहे. पुढच्या 20 वर्षांतील अर्थव्यवस्था ही या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तयार होणार आहे.