Latest Marathi News

BREAKING NEWS

सहा लाखाच्या हायहोल्टेज महासभा यशस्वीतेला बलकवडे पॅटर्नचा टच

0

राज्यात आतापर्यंतच्या सभांचे गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारी अशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणानिमित्त अंतरवली सराटी येथे महासभा झाली. सभेसाठी किमान सहा लाखांहून अधिक बांधव आल्याचा विविध संस्थांचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी ही महासभा शांततेत झाली, त्याच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात दिड महिन्यापूर्वीच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानूष लाठीचार्ज केला, क्रियेची प्रतिक्रिया म्हणून पोलीसांवर दगडफेक झाली. ही भळभळती आठवण घेवून सहा लाख मराठा बांधव त्याच गावात पुन्हा एकत्र येत होते. या सभेला संपूर्ण मराठवाड्यातून जनसागर उसळला. हजारो वाहने, लाखोंची गर्दी, एखादा फेक मेसेज वा समाजकंटकाची एखादी कृती, सभास्थानी दुसऱ्या कारणाचे झालेली बाचाबाची लाखोंच्या जनसागराला प्रक्षुब्ध बनवेल अशी स्थिती असताना, ही हायहोल्टेज महासभा आश्चर्यकारकरित्या शांततेत पार पडली कशी ? लाखोंची गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या भितीच्या जोडीला ऑक्टोबर हिटचा तडाख्याने उष्माघाताचे बळी वाढण्याची शंकाही होतीच. महासभेला गालबोट लागल्यास त्याचे तत्काळ तसेच दिर्घकालीन परिणाम शासनकर्त्याना भोगावे लागले असते. महासभेला गालबोट न लागता ती यशस्वी होण्यास मराठा बांधवांचा शिस्तबध्द आणि शांतताप्रिय स्वभाव जितका कारणीभूत ठरला, तितकाच पडद्यामागे जलदपणे प्रामाणिक कृती करत स्वत: २३ तास उभे राहून खडा पहारा देणारे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा अनोखा पॅटर्नसही तितकाच महत्वाचा ठरला.

अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबरला म्हणजे दीड महिन्यापूर्वी झालेला लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटनेमुळे पोलिसांवर आंदोलकांचा मोठा रोष निर्माण झाला होता. किंबहुना पोलीसांचा लाठीचार्जच ही घटनाच हे आंदोलन अधिक व्यापक करण्यास तसेच राज्यभरातून सहानुभूतीची लाट तयार होण्यास कारणीभूत ठरले होते. लाठीचार्जनंतर दुसऱ्याच दिवशी प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जालना पोलीस दलाचा पदभार घेतला होता. पोलीसांना गावकऱ्यांनी बंदी घातली, पोलीस आणि गावकरी यांच्या कधीही पुन्हा उद्रेकाची ठिणगी पडेल, अशी स्थिती असताना लाठीचार्ज घटनेच्या ४८ तासात शैलेश बलकवडे यांनी फक्त एक कर्मचारी सोबत घेवून अंतरवली सराटीत जरांगेंची भेट घेतली. ते मुक्तपणे गावकऱ्यांशी बालले, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर अल्पकाळातच पोलीस आपले मित्र आहेत ही भावना गावकऱ्यात पुन्हा रुजवण्यात बलकवडे यांची प्रामाणिक कृती उपयोगी ठरली. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकार आणि त्यांच्यात संवादाचा सेतू बांधण्यात शैलेश बलकवडे यांचा सिंहाचा वाटा होता. यापार्श्वभूमीवर १४ ऑक्टोबरला सभेसाठी जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील बांधवांना हाक दिली. ही सभा इतकी विराट आणि विक्रमी होईल याचा अंदाज सुरूवातीला नव्हता. मात्र, मराठा आरक्षण मागणीचा मराठवाड्यातील अंडरकरंट ओळखून असलेल्या शैलेश बलकवडे यांनी सभेला किमान पाच लाख लोक आणि हजारो वाहने येथील हा अंदाज बांधत, मागील दहा दिवसांपासूनच सभा सुरळीत पाडण्यासाठी नियोजन सुरू केले. मात्र नियोजन करताना दगडफेक आणि लाठीचार्जमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या जालना पोलीसांना विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान बलकवडे यांच्यापुढे होते. पोलीसांनी अन्याय केला ही भावना घेवून येणाऱ्या प्रचंड जमावापुढे खाकी वर्दीसह लाठी घेवून उभारण्याचे धाडस पोलीस दलात कोठुन येणार ? त्यासाठी बलकवडे विना लाठी बंदोबस्त ही संकल्पना राबवली. जरांगे पाटील आणि त्यांच्या टीम सोबत अनेक बैठका घेवून सभेची आचारसंहिता ठरवली. ती आचारसंहिता सभेला येणाऱ्या प्रत्येकापर्यंत मोबाईल वॉटस्ॲपच्या माध्यमातून पोहचून ती बिंबवली. यातून सभेला येणाऱ्यांची एकविशिष्ट मानसिकता तयार होण्यास मदत झाली. दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी सतत संपर्क ठेवून असलेल्या शैलेश बलकवडे यांची कार्यभार स्विकारल्यापासूनची प्रामाणिक कृती पोलीस दलाबद्दल जालनावासीयांत विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरली. दीड महिन्यापूर्वी पोलीसांना दिसेल तिथे ठोका ही मानसिकता पोलीस आपले मित्र आहेत, त्यांना सहकार्य करा, असे आवाहन करण्यापर्यंत गेली ती निव्वळ शैलेश बलकवडे यांच्या कार्यपध्दतीमुळेच शक्य झाले होते.

जालना जिल्ह्यात पोलीसांबद्दलचा रोष कमी झाला असला तरी संपूर्ण मराठवाड्यातून येणाऱ्या बांधवांच्या मनात पोलीस यंत्रणेवरील राग होताच. सभाकाळातील एखादा मेसेज वा वादावादी मोठं तांडव निर्माण करु शकणारी होती. या अर्थाने हायहोल्टेज अशी ही महासभा राज्य सरकार आणि प्रशासनाची परीक्षा होती. तरीही लाखोंचा समाज महासभेला आला अन्‌ शांततेत परत कसा गेला ? त्यास बलकवडे यांचे सुक्ष्म नियोजन उपयोगी ठरले. एका स्पॉटला एक अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी आणि दहा स्वयंसेवक असे बंदोबस्ताची प्राथमिक रचना बलकवडे यांनी केली. त्यांनी सभेसाठी किमान दोन हजार स्वयंसेवकांची टीम तयार करुन त्यांना स्वत: एकत्रित मार्गदर्शन करुन नेमकं काय करायचं ते स्पष्ट करुन सज्ज ठेवले. स्वयंसेवकांवरील जबाबदारी निश्चित करुन त्यांना सभास्थानी पहिल्या फळीत स्थान दिले. सभा परिसरात एकही पोलीस लाठी घेवून किंवा डोक्याला हेल्मेट घालून जाणार नाही, ही बलकवडे यांची सभेसाठी आलेल्यांना पोलीसांवरील विश्वास वाढवण्यास कारणीभूत ठरली. सभेचं यश ही आपले टीम वर्क असेल, तर दुर्दैवाने अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल हे बंदोबस्तावर तैणात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर त्यांच्यावर बलकवडे यांनी बिंबवले. बलकवडे यांनी विश्वास दिल्याने मनातून पूर्णत: घाबरलेली आणि प्रचंड तणावाखाली असलेली येथील यंत्रणा रिचार्ज झाली. बंदोबस्तावर तैणात पोलीसांवरील ताण कमी होण्यास मदत झाली. सभेसाठी किमान पाच लाख लोक येतील हा अंदाज बलकवडे यांचा खरा ठरला. पहिल्या टप्प्यात केलेले ५० एकरातील पार्कींग अपुरे पडेल म्हणून त्यांनी तशीच आणखी चार पार्कींग व्यवस्था तयार ठेवली. सभास्थानापासून एक ते साडे किमी अंतरावर असलेल्या या लांबच्या पार्कींगमुळे सभेला येण्यास लोकांना विलंब होईल, पार्कींग लांब ठेवून सभेची गर्दी करण्याचा यंत्रणेचा डाव तर नाही ना ? या आयोजकांच्या शंकेचं बलकवडे यांनी वेळीच निकारण केले. रस्त्यात किमान तीन किलोमिटरपर्यंत सभा ऐकता येईल, जेणेकरुन सभेला येणाऱ्यांना उशीर झाला तरी वाटेत थांबूनच ऐकतील अशी ध्वनी यंत्रणा करण्यास आयोजकांना सुचित करुन अंमलात आणले. उन्हाचा तडाखा असतानाच ही सभा बारा वाजता होणार होती. सभे दिवशी सकाळपासूनच उष्मा वाढत असल्याने रात्रीपासून सभास्थानी दाखल झालेल्यांना उष्माघाताचा धोका होता. म्हणूनच बलकवडे यांनी तीसपेक्षा अधिक ॲम्ब्युलन्स, व्यासपीठामागे १०० खाटांची जलद उपचाराची सोय, स्ट्रेचर्स, वैद्यकीय पथकात तज्ज्ञ तसेच कर्मचारी सज्ज ठेवले होते. दीडशे एकरातील सभास्थानाचे लहान भाग करत चौक तयार केले होते. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, सोपे गेले. या प्रत्येक चौकानजीक पाण्याची पुरेशी व्यवस्था, आणि वैद्यकीय पथक तयार ठेवली. जरांगे पाटील यांना बाराऐवजी एक तास अगोदर सभा सुरु करण्यासाठी बलकवडे यांनी समजूत काढली. जेणेकरुन सभा वेळेत सुरू होवून संपली.

आता हजारोंच्या संख्येने आलेली वाहनं संध्याकाळ होण्यापूर्वी वेळेत मार्गस्थ होणे गरजेच होते. मात्र सभेपूर्वी तास दोन तास अगोदर आलेली वाहने मुख्य मार्गावर लावली होती. या रस्त्यात लावलेल्या वाहनांमुळे कोंडी झाली. त्यांच्या मागील वाहने खोळंबली आणि आठ किलोमीटरपर्यंत वाहतूकीची कोंडी झाली. रस्त्यात लावलेली वाहने रिकामी असल्याने संबंधित चालक आल्यानंतर ती मार्गस्थ होणार होती. या दोन तासांच्या कोंडीनंतर सभेला आलेल्यांचा संयम सुटू लागला. हा बाका प्रसंग ओळखून शैलेश बलकवडे हे तत्काळ आठ किलोमीटरपर्यंत चालत गेले. शेवटच्या वाहनापर्यंत पोहचले. अनेक आडवी वाहने रस्सी आणि इतर वाहनांच्या साथीने बाजूला करत अढथळे दूर केले. एकेरी वाहतूक सुरू केली. ज्यामुळे पुढील अर्ध्यातासात कोंडी कमी होवून वाहनं मार्गस्थ झाली. सभास्थानी आदल्या दिवशी रात्री दोन वाजता हजर झालेले शैलेश बलकवडे पुढील २३ तास सलगपणे उभे होते. आपला कॅप्टनच अविरत कष्ट घेत आहे, न बसता उभा आहे, हे बघून तेथील पोलीस कर्मचारीही तितक्याच जोमाने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावण्याची भावनेनं राबला. अन्‌ प्रशासन आणि राजकारण्यांना हायहोल्टेजवर ठेवणारी ही महासभा शांततेत पडली.

संतोष पाटील (पत्रकार, कोल्हापूर)

..

Leave A Reply

Your email address will not be published.