गाजियाबाद |
उत्तरप्रदेशाच्या गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. मंगळवारी सकाळी नोएडामध्ये एका खासगी शाळेची बस आणि कारची धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तरप्रदेश पोलिसांकडून सुरू आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्लीजवळीत गाझीपूर येथील सीएनजी पंपावरुन बस चालकाने गॅस भरला आणि नंतर उलट्या दिशेने त्याने बस काढली. चुकीच्या दिशेने धावणाऱ्या स्कूल बसने कारला जोरदार धडक दिली. या कारमधून आठ जण प्रवास करत होते, त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्हीही आता समोर आले आहे.