सिल्लोडमधील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला. आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा प्रश्न पाटील यांनी ठाकरे गटातील नेत्यांना विचारला.
साधा नगरसेवक निघाला तर झोप येत नाही. 40 आमदार निघाले तर तुम्हाला काही वाटत नाही. याचा अर्थ नेतृत्व कमकुवत आहे, असं मानायला काही हरकत नाही,असेही पाटील म्हणाले. मी शाळेतलं दप्तर हातात होतं तेव्हापासून शिवसेनेचं काम केलं. शि म्हणजे शिस्तबद्द, व वचनबद्ध, से सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांना जिथं स्थान नाही ती सं घटना, पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांचे कौतुक केले.
एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. तो म्हणजे अब्दुल सत्तार. सत्तार हे जसे बोलण्यात हुशार आहेत तसेच काम करण्यात हुशार आहेत. 40 लोकांच्या जत्थ्यात पहिले जाणारे अब्दुल सत्तार. आम्ही समजवायला गेलो. खासदार महामंडलेश्वर श्री श्री श्री संजयजी राऊत यांनी सांगितले तुम्हाला जायचे असेल तर जा. म्हणाले उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आम्ही उद्धव साहेबांना सांगून निघालो. कोण म्हणतो गद्दारी केली? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .