Latest Marathi News

BREAKING NEWS

“सीएमओ आॉफिसला मिळाले नवे नेतृत्व!!”-

0

-जमीर काझी,
मुंबई,

महाराष्ट्र पोलीस दलातील जेष्ठ आयपीएस अधिकारी, अप्पर महासंचालक ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. १९९६ च्या आयपीएस बॅचचे हे अधिकारी मितभाषी पण मनमिळावू स्वभावाचे आहेत.

एखाद्यावर विश्वास बसला, मैत्री झाली की त्याच्यासाठी सर्वतोपरे सहकार्य करणार, तोंडावर एक आणि मनात दुसरे असे त्यांच्याबाबत कधीही झालेले नाही , जे काही आहे स्पष्टपणे सांगून टाकणार,भलेही तो विषय त्याच्यासाठी अडचणीचा असो, त्याची तमा बाळगत नाहीत,याचा प्रत्यय मी स्वतः गेल्या दीड दशकाच्या संपर्कातून अनेक वेळा घेतला आहे. एखादे उद्दिष्ठ ठरविल्यानंतर तर ते पूर्ण करण्याची त्यांची हातोटी, त्यासाठी हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्याना समजून घेऊन त्यांच्याकडून मुदतीत काम करून घेण्याचे त्यांचे नेतृत्व गुण व कौशल्य अफलातून आहे. राज्यातील ‘पॉवरबाज’ राजकारणी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील हे गुण हेरून त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदारी सोपविल्या होत्या.

त्यामुळे विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना जाणीवपूर्वक ‘साईड’ला ठेवण्यात आले. राज्याचे माजी प्रभारी पोलीस महासंचालक व साडेचार महिने मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले संजय पांडे हे प्रामाणिक अधिकारी असले तरी त्यांचा स्वभाव प्रचंड खूनशी आणि संशयी होता. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील आपला राग काढण्यासाठी त्यांनी ब्रिजेश सिंह यांना त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला .त्यांनी व काही अधिकारी , राजकारण्यांनी त्यांच्याबद्दल आघाडीच्या शिल्पकार, मुख्यमंत्र्यांकडे अनेक गैरसमज पसरविले होते. त्यामुळे वादग्रस्त जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याप्रमाणे त्यांच्यामागेही शुक्लकाष्ट लावण्याचा खूप प्रयत्न झाले. पण ब्रिजेश सिंह यांच्या कामाच्या सचोटीत एक टक्काही उणी बाजू मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचे डाव पुर्णपणे हाणून पडले. आघाडी सरकारमधील दोन्ही गृहमंत्र्यांना सुरुवातीच्या गैरसमजानंतर त्यांच्यावर पुर्ण विश्वास बसला होता.मात्र राजकीय अपरिहारतेमुळे त्यांना ते ‘एक्झिक्युटिव्ह ‘पोस्टिंग देऊ शकले नाहीत. ब्रिजेश सिंह यांनी त्याची पर्वा न करता मुख्यालयातील प्रशासन व बढतीनंतर होमगार्ड मध्ये उपमहासमादेशक म्हणून काम करताना पोलीस व होमगार्ड जवानांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक बाबीवर आवश्यक प्रस्ताव बनवले, काही निर्णय घेतले .

शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नव्या फेरबदलामध्ये ब्रिजेश सिंह यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल ,अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी तसे झाले नाही. आता त्यांची प्रतिनियुक्ती थेट सीएमओ ऑफिसचे प्रधान सचिव म्हणून झाली आहे. पोलीस दलातील एखादा अधिकारी ही जबाबदारी सांभाळण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या प्रमुखाचे प्रधान सचिव हे पद अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे पोलीस दलातील काही वरिष्ठ आयपीएस व सनदी अधिकारी नाराज झाल्याने यांच्या वर्तुळात हे त्याठिकाणी जावून काय करणार?, अशी उलटसुलट चर्चा घडविणे साहजिक आहे. मात्र आपल्या कामामध्ये १०० टक्के रिझल्ट देणारा अधिकारी म्हणून ब्रिजेश सिंह यांची ख्याती आहे. ही नवी जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील , याची पूर्ण खात्री आहे त्यांना या जबाबदारीबद्दल मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.