Latest Marathi News

BREAKING NEWS

विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे |

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील विधान भवन येथे आज चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक झाली. पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या अभिवादन सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जनता येते. त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याची आणि कागदी ग्लासची व्यवस्था करावी, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली. येणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात. राज्य मार्ग ११८ लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणं, पुणे- नगर रोड ते प्रजिमा २९ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पाटील यांनी केले. सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत. नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली. कोविड नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता १६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आले आहे. बसेस, १४०० तात्पुरती स्वच्छतागृहे, २० रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.