Latest Marathi News

BREAKING NEWS

“वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचे विविध उपक्रम ग्रंथालयांनी राबवावेत..!” – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित पुणे जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ चा आज समारोपाचा कार्यक्रम संपन्न  झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  चंद्रकांत पाटील यांनी यावेळ म्हटले कि, वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्विकारण्यास सुरूवात करण्यात येईल, असे म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, आजच्या आधुनिक काळात वाचनाची आवड थोडीही कमी झाली नाही. उलट जिथे उपलब्ध होतील, त्या ठिकाणांना वाचनप्रेमी मंडळी आवडीने भेट देतात. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रंथोत्सव मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत. तसेच यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शनीसोबत विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील झाले पाहिजेत, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.     

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, नागरिकांमध्ये वाचनाची आवड आहे, त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके पोहोचविल्यास वाचनाकडे वळतील. त्यामुळेच गाव तेथे ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रंथालयाच्या आवारात प्रदर्शनासाठी परवानगीची गरज नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. ग्रंथ प्रदर्शन विविध ठिकाणी झाल्यास प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक आणि ग्रंथाची भेट होते, ते पुस्तक खरेदी करतात, वाचतात आणि त्यातील विचार इतरांना सांगतात. ही प्रकिया गतीमान होण्यासाठी वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचे विविध उपक्रम ग्रंथालयांनी राबवावेत, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

६६ कोटींची पुरवणी मागणी ग्रंथालय अनुदानात वाढ करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात ठेवण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ग्रंथालयांना साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वूडन देण्याचा विचारही असल्याचे ते म्हणाले. ग्रंथ खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च त्यांना अनुदानातून भागविता येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, उपायुक्त राजेंद्र मुठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, उद्यम बँकेचे संचालक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.