मुंबई : महागाई दर कमी झाल्याने द्विमासिक पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जेणेकरून कर्ज स्वस्त होईल आणि कर्जदारांचा ईएमआयदेखील कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर बुधवार, दि. ९ एप्रिल २०२५ रोजी रेपो रेटमध्ये आणखी २५ बेसिस पॉईंटची कपात केली. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हट्टाला पेटत सुरु केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात हाहा:कार उडालेला असताना रिझर्व्ह बँकेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आल्याने रेपो रेट हा ६ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर ३.६१ टक्क्यांवर घसरला आहे. तर हाच दर जानेवारी महिन्यात ४.२६ टक्के इतका होता. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा खरी ठरल्याने सामान्य गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला.
सलग दुस-यांदा रेपो रेटमध्ये कपात
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आगामी काळात बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्याने बँकाकडून कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो. याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सामान्यांना होऊ शकतो.