साहेब,
महाराष्ट्रातील बार्शीमधे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन मजल दरमजल करत आपलं करियर बनविण्यासाठी पोलिसात नोकरी लागावी म्हणून तुम्ही जिवापाड मेहनत घेतली असेल हे निश्चित. ज्यावेळी तुम्ही भरतीसाठी परीक्षा द्यायला उभे असाल त्यावेळी फक्त पोलीस दलात नोकरी लागावी एवढाच काय तो अंतिम विचार तुमच्या मनात असेल तुम्ही भरती परीक्षा पास झालात. आणि तुम्ही नोकरीला लागल्या नंतर आपला परफॉर्मन्स उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत तसाही हा पोलीस सेवेतील रुटीनचा भाग होता. मात्र तुमच्या कारकिर्दीला उच्च स्वरुप तेंव्हा प्राप्त झाले जेंव्हा तुम्ही महाराष्ट्रातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये आपली ड्युटी बजावल्यानंतर नवी मुंबई सारख्या व्यस्त स्वरूपाच्या ठिकाणाहून खोपोली सारख्या छोट्याश्या शहराच्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पद घेतलेत. हा पदभार स्वीकारताना निश्चितच तुमच्या मनात कुठेतरी किंतु परंतु आला असेल, वरिष्ठांनी आपल्याला मुद्दामहून या ठिकाणी रुजू होण्यास सांगितल्यामागे त्यांची नाराजी आपल्यावर तर नाही ना ? असा प्रश्न तुमच्या मनचक्षु समोर उभा राहिला असेल. मात्र खोपोलीत आल्यानंतर तुमच्या कारकीर्दीत कधी अनुभवले नसतील असे एका मागोमाग अनुभव तुम्हाला येत राहिलेत. एकही दिवस शांत चित्ताने ड्युटी करत असल्याचा आभासही तुम्हाला झाला नाही याचे साक्षीदार आम्ही सगळे आहोत. आपल्या कारकीर्दीत खोपोली सारखं सर्वांगीण काम करण्यास अनुकूल असं पोलीस स्टेशन कोणाही पोलीस अधिकाऱ्याला नशिबाने मिळतं हे निश्चित हे तुम्हाला सातत्याने जाणवत असेल.
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली शहरात हिमालयासारखे मोठे मन असलेले नागरिक वास्तव्यास असतात, म्हणूनच याच ठिकाणी तुमच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुवर्ण झळाळी लाभलेली आहे. आजवर या खोपोली शहराच्या मातीने अनेकांना राजा होतांना पाहिलेय किंबहुना या मातीतच ते सत्व आहे, म्हणूनच या पुण्यभूमीत कार्यरत असताना तुमच्या छातीवर पोलीस दलातील सन्मानाची अत्युच्च बिरुदावली व्यक्तिमत्वाची आभा विस्तारणारी ठरली आहे.
आज तुमच्या सारखाच तूमच्या जन्मदात्या आई-वडिलांना, सहचारणीला, तुमच्या चिरंजीव आणि आप्तेष्टांना जो असीम असा परमानंद झाला असेल. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या, तुमच्यासोबत कार्यरत असलेल्या आणि तुमचे अधिकारी म्हणून ज्यांच्याशी तुमचा संपर्क झाला असेल त्या सर्वांची मान आज गर्वाने ताठ झाली असेल. होय जेवढा अभिमान तुम्हाला आणि तुमच्या सोबतच्या सर्वांना आहे त्याहीपेक्षा किंचित जास्त तो आम्हाला वाटतो, कारण ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या’ प्रत्येक घटकाने तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सन्मानात भर पडेल असा खारीचा वाटा उचलला आहे.
“महामहीम राष्ट्रपती पदकाचा सर्वोच्च सन्मान प्राप्त पोलीस निरीक्षक शिरीष पवार साहेब” आज हा सन्मान प्रत्येक खोपोलीकरांच्या छातीवर विसावला असल्याचा आभास होत असल्याने आमची छाती अभिमानाने रुंदावली असल्याचे सत्य लपून राहत नाहीये. तुम्हाला आजचा प्रजासत्ताक दिन, आम्हा खोपोलीकरांचे प्रेम आणि सद्भाव आयुष्यभर आठवत राहील. तुम्हाला याहून मोठे असे सन्मान जेंव्हा जेंव्हा प्राप्त होतील तेंव्हा तेंव्हा या खोपोलीकरांची आवर्जून आठवण होत राहील.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
: गुरुनाथ रामचंद्र साठेलकर
“खोपोलीकर”