“मासिक पाळी”, जिचा अनेक स्त्रिया “प्रॉब्लेम” किंवा “अडचण” या टोपण नावाने उल्लेख करतात, ती प्रत्यक्षात स्त्रीच्या आयुष्याला लाभलेले खूप मोठे वरदान आहे
"मासिक पाळी", जिचा अनेक स्त्रिया "प्रॉब्लेम" किंवा "अडचण" या टोपण नावाने उल्लेख करतात, ती प्रत्यक्षात स्त्रीच्या आयुष्याला लाभलेले खूप मोठे वरदान आहे
©️डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn
बार्शी.
नमस्कार
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
#नवरात्र_माळ_आठवी
#रजोनिवृत्ती
#मेनोपॉज.
आजचा हा लेख सुद्धा स्त्रियांइतकाच पुरुषांनी अवश्य वाचावा ही माझी विनंती आहे.
“मासिक पाळी”, जिचा अनेक स्त्रिया “प्रॉब्लेम” किंवा “अडचण” या टोपण नावाने उल्लेख करतात, ती प्रत्यक्षात स्त्रीच्या आयुष्याला लाभलेले खूप मोठे वरदान आहे. स्त्रीत्व हे मासिक पाळी शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिच्या जाण्याला सुद्धा आपल्या भाषेमध्ये खूप सुंदर नाव आहे… “”रजोनिवृत्ती”
रजोनिवृत्ती….स्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा महत्त्वाचा टप्पा. प्रत्येक टप्प्यावर शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाताना स्त्रीची अक्षरशः कसोटी लागते हे आपण आत्तापर्यंत पाहिले. परंतु या शेवटच्या टप्प्यावर मात्र शरीर आणि मन दोघेही सुद्धा बंड पुकारतात आणि हा शेवटचा टप्पा सर्वात जास्त त्रासदायक ठरतो.
रजोनिवृत्ती चे कारण त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय आपण आज जाणून घेऊया
१)रजोनिवृत्ती चे कारण:
पहिल्या माळेतील लेखात सांगितल्याप्रमाणे जन्माला येताना स्त्रीच्या शरीरामध्ये असलेल्या अंडाशयात लाखांच्या घरात बीजांडे अविकसित अवस्थेत असतात. जसजसे वय वाढू लागते त्यासोबत त्यांची संख्या कमी होऊ लागते. पाळी सुरु झाल्यानंतर यातील काही बीजांड विकसित होतात त्यातूनच गर्भधारणा राहते. वयाच्या 45 वर्षानंतर कमी होत आलेली या बीजांची संख्या शून्यावर येते आणि जवळपास जन्मभर दर महिन्याला येऊन चार दिवस सोबत करणारी मासिक पाळी एके दिवशी कायमची बंद होते. साधारण एक वर्षभर पाळी जेव्हा येत नाही तेव्हा आपण रजोनिवृत्ती झाली असे म्हणतो.
२) मेंस्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळीचे जे चक्र असते हा सगळा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचा खेळ असतो. एका प्रकारे स्त्रीचे शरीर या हार्मोन्स वरती खूप अवलंबून राहिलेले असते. या हार्मोनची प्रत्येका अवयवाला आणि मनाला सुद्धा सवय झालेली असते. बीजांची संख्या कमी होत जाते त्यासोबतच या हार्मोनची शरीरातील पातळीसुद्धा कमी होत जाते आणि रजोनिवृत्तीची लक्षणे शरीरावर आणि वागण्यामध्ये दिसून येतात. जेव्हा बीजांडे पूर्ण संपतात तेव्हा हार्मोन्स देखील देखील रक्तामधून लोप पावतात. आणि तिथून सुरू होतो जीवघेणा रजोनिवृत्ती चा त्रास.
पण हा त्रास सर्व स्त्रियांनाच होतो का? तर नाही… Gracefully aging हा शब्द मला लहानपणापासून खूप आवडतो. कोणताही विशाल वृक्ष पाहिला की मला हाच शब्द आठवतो.” मोठे व्हावे, वयस्कर व्हावे परंतु अतिशय शानदार प्रकारे व्हावे”. एखादा विशाल वृक्ष जसा निसर्गानुरूप त्याच्यामध्ये होणारे प्रत्येक बदल तटस्थ राहून ,जागरूकपणे स्वीकारत असतो आणि स्वतःमधील सर्व काही चांगलेच बाह्य रुपात प्रकट करीत असतो त्याप्रमाणे आपण स्त्रियांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या शरीरात आणि मनात होणारे प्रत्येक बदल तटस्थ आणि जागरूक वृत्तीने स्वीकारले तर हे सर्व टप्पे लीलया पार पडतात.
३) रजोनिवृत्तीची लक्षणे:
🔸पाळी अनियमित होणे आणि त्यानंतर बंद होणे,
🔸सांधे, हाडे, स्नायू यांचे दुखणे वाढणे,
🔸कोणत्याही कारणावरून खूप जास्त चिडचिड होणे, त्यामुळे सोबत राहणाऱ्या व्यक्तीं बरोबर भांडण होणे,
🔸लघवीसाठी वारंवार जावे लागणे, लघवी थांबवून न ठेवता येणे,
🔸त्वचा, केस , योनीमार्गाची जागा या सर्वांमध्ये कोरडेपणा वाढणे, केस विरळ होणे, चेहेऱ्यावर सुरकुत्या पडणे,
🔸प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे आणि क्षुल्लक कारणावरून देखील रडावेसे वाटणे किंवा रडू येणे,
🔸शरीराचे तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये खूप तफावत जाणवणे आणि त्यामुळे कधी खूप गरमी होणे तर कधी खूप थंडी वाजून येणे,(hot flushes)
🔸वैवाहिक आयुष्याबद्दल औदासीन्य येणे.
🔸शरीराला मार लागल्यास किंवा accident झाल्यास कमी प्रमाणात मार लागून देखील हाड फॅक्चर होणे.
🔸रात्रभर झोप न येणे. आणि त्यामुळे दिवसभर गळाठा आणि थकवा येणे.
४) वर उल्लेख केलेली लक्षणे स्त्रियांमध्ये वय वर्ष 40 पासूनच थोड्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते. हळूहळू कमी होत जाणाऱ्या हार्मोनच्या लेव्हल याला कारणीभूत असतात. दर महिन्याला न चुकता येणारी पाळी कधीकधी लांबत जाणे, किंवा कधीकधी महिन्यातून दोन वेळा येऊन जाणे हे यातील प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे अशा स्त्रियांना पाळीची निश्चित तारीख ठरवता येत नाही. *पाळी जरी अनियमित होत असेल तरी बीजांडे मात्र तयार होत असतात. त्यामुळे या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक साधन वापरले नसल्यास प्रेग्नेंसी राहू शकते. अशावेळी याबाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे.*
५) वरती सांगितलेल्या लक्षणांपैकी hot flushes म्हणजे शरीरात डोक्यापासून पायापर्यंत प्रचंड गरम लहरी उसळणे आणि खूप जास्त गर्मी होणे, चेहेरा लाल लाल होणे. हे दहा पंधरा दिवसातून एकदा होऊ शकते किंवा एकाच दिवसात दहा-पंधरा वेळेला सुद्धा होऊ शकते. कित्येकवेळा बाकी सर्वांनी sweater घातले असताना या स्त्रियांना खूप गर्मी होऊ शकते. तर कधी कधी याच्या अगदी उलट घडते.
तसेच इस्ट्रोजन हार्मोन जे आपल्या गर्भपिशवी आणि मूत्राशयाच्या आजूबाजूच्या स्नायूंना ताकद देत असते ते शरीरातून संपल्यामुळे तेथील स्नायू शिथिल पडतात. त्यामुळे लघवीवर कंट्रोल राहत नाही. लघवी साठी जास्त वेळ थांबून राहू शकत नाहीत. कधीकधी शिंका किंवा खोकला आल्यावर सुद्धा आपोआप लघवी होऊ शकते. असे प्रॉब्लेम कोणाला सांगण्यास देखील लाज वाटत असल्यामुळे स्त्रीया लपवून ठेवतात, आणि मग खूप जास्त कॉम्प्लिकेशन झाल्यावर ते उघडकीस येतात. तसेच ज्या स्त्रियांनी आयुष्यभर वजन उचलण्याचे किंवा पोटावर ताण येईल असे, पायाच्या चवड्यांवर बसून काम केले आहे त्यांची गर्भपिशवी या वयामध्ये तिच्या जागेवरून खाली सरकू शकते. या सगळ्या गोष्टींकडे होणारे बदल म्हणून पाहिले तर त्याविषयी लाज न वाटता आपल्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल याचा विचार स्त्री करू शकते.
६) याशिवाय इस्ट्रोजन हे हॉर्मोन हृदय आणि हाडे यांना सुद्धा जन्मभर खूप जपत असते. त्यामुळे स्त्रियांचे तरुण वयात हृदय रोगापासून संरक्षण होते. तसेच हाडे देखील बळकट आणि मजबूत राहतात. पाळी गेल्यानंतर मात्र हे संरक्षक कवच निष्क्रिय होते आणि हाडांचे आणि सांध्यांचे दुखणे वाढते, हाडे ठिसूळ होतात, थोडेसे लागले तरी वारंवार फॅक्चर होऊ लागते. तसेच हृदय रोग होण्याची शक्यता सुध्धा या वयानंतर वाढीस लागते .
७) उपाय:
A) आज पर्यंत लिहिलेल्या सर्व लेखांमध्ये सांगितल्या प्रमाणे इथे सुद्धा मी आवर्जून हेच सांगेल की, मेनोपॉज मध्ये होणाऱ्या त्रासावर सुद्धा योग्य आहार आणि आदर्श जीवनशैली हाच कायमस्वरूपी उपाय आहे. या काळामध्ये “आजपर्यंत आयुष्य एन्जॉय करायचे राहून गेले आता एन्जॉय करून घेऊ या!” ट्रेण्डचा चुकीचा अर्थ काढून वाट्टेल ते खाणे पिणे जागरण करणे व्यायाम ध्यानधारणा करण्याऐवजी पार्ट्या करत बसणे हे न करता आज पर्यंत स्वतःसाठी जर आदर्श आहार घेतला नसेल तर तो घेणे सुरू करावे, स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम प्राणायाम केले नसतील तर ते नियमितपणे सुरू करावेत आणि मानसिक आरोग्यासाठी वाचन, मनन, चिंतन आणि छंद याला वेळ द्यावा. *आयुष्याचा हा शेवटचा टप्पा जेवढा अंतर्मुख होऊन व्यतीत करू तेवढा परतीचा मार्ग सोपा होतो.*
B) मेनोपॉज मध्ये होणाऱ्या त्रासाचे कारण इस्ट्रोजन ची कमी झालेली पातळी आहे हे आपण पाहिले त्यामुळे शरीरामध्ये आहाराच्या माध्यमातून इस्ट्रोजन वाढवणे हा त्यावरील उपाय आहे. अनेक वनस्पती आणि त्यापासून मिळणारे धान्य, फळे, पाने यांच्यामध्ये इस्ट्रोजन आढळून येते ज्याला “फायटोइस्ट्रोजन” असे म्हणतात.. या वनस्पती म्हणजे सोयाबीन, जवस, सब्जाच्या बिया, पालक, ब्रोकोली, मूग डाळ, चना डाळ, राजमा, छोले, उडद डाळ, मनुके आणि बेदाणे . यासारख्या पदार्थांमधून आपल्याला estrogen मिळते..
C)हाडे बळकट राहण्यासाठी शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण भरपूर असणे गरजेचे आहे. यासाठी आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश वाढवावा. यामध्ये देखील चहा आणि कॉफी न घेता दूध घ्यावे, चीज ऐवजी पनीर खावे, विकतचे दहिना आणता घरी मातीच्या भांड्यात लावलेले दही खाणे उत्तम. आज-काल वाढत असलेल्या Lactose intolerances चे प्रमाण लक्षात घेता दुधाऐवजी सोया मिल्क अँड मिल्क असे प्रकार देखील आहारामध्ये समाविष्ट करून दुधाची उणीव भरून काढू शकता. यासोबतच पालक, भेंडी, फणस, खजूर, चिंच, सब्जा, तील, अक्रोड, संत्रे, केळी, avocado, काजू, बदाम, शेवगा, राजगिरा या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते.
D)तसेच वर सांगितल्याप्रमाणे या काळामध्ये वाढलेली हृदयरोगाची शक्यता लक्षात घेता जास्त तेलकट, खारट, तिखट पदार्थ, मुरवलेले पदार्थ याचे प्रमाण आहारात अत्यंत अल्प केले पाहिजे. आणि त्या ऐवजी जास्तीत जास्त “नैसर्गिक स्थितीमध्ये असलेले पदार्थ” म्हणजेच फळे कच्च्या भाज्या किंवा मोड आलेले कडधान्य आणि डाळी यांचा समावेश आहारामध्ये वाढवला पाहिजे.
E) यानंतर महत्वाचे आहेत मानसिक बदल. या काळामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे होणाऱ्या mood swings ना बळी जायचं असेल तर आपले मन आपल्या ताब्यात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आपले मन आपल्या ताब्यात तेव्हाच असते जेव्हा आपण जास्तीत जास्त अंतर्मुख होतो, कोणत्याही घटनेला प्रतिक्रिया न देता सारासार विचार करून मग त्यावर आपले म्हणणे शांतपणे मांडतो. या काळामध्ये स्त्री जेवढी आनंदी राहील तेवढा हा बदल खूप सहजपणे स्वीकारणे शक्य होते. आणि आनंदी होण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून न राहता या काळात स्वतःमधील कला-गुणांना आणि छंदांना वाव द्यावा. कलागुणांची जोपासना करण्यात जेवढे मन गुंतून राहील,एकाग्र होईल, तेवढी स्वीकार करण्याची वृत्ती वाढीस लागते. स्त्री शांत आणि संयमी होते. नृत्य गायन वाचन लिखाण भ्रमंती झाडांची जोपासना यासारख्या अनेक गोष्टींना जन्मभर वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे न्याय देता आलेला नसतो . संसाराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे या गोष्टी आता अगदी समरसून करता येऊ शकतात. परंतु हे छंद जोपासण्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्या सबळ आणि सक्षम असणे देखील गरजेचे आहे. रोजच्या नियमित व्यायाम सोबतच प्राणायाम आणि रजोनिवृत्ती तील काही त्रास आन साठी सुचवले गेले वेगळे व्यायाम जसे की “कीगल एक्सरसाइज” यामध्ये नियमितता असणे आवश्यक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे या स्त्रियांना लघवी करताना त्यावरील नियंत्रण कमी झाल्याचा त्रास आहे अशा स्त्रिया “कीगल एक्सरसाइज” नियमितपणे करून याला बर्याच प्रमाणात आळा घालू शकतात. असा त्रास असल्यास आपल्या स्त्री-रोग तज्ञांकडे जाऊन याविषयी अधिक जाणून घ्यावे. नियमित व्यायाम केल्यामुळे एंडॉर्फिन नावाचे हार्मोन शरीरामध्ये तयार होऊन ते आपली मानसिक स्थिती आनंदी आणि उत्साही ठेवण्यात मदत करतात.
F)शेवटचा मुद्दा म्हणजेच हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी (HRT):
या उपचाराची गरज त्या स्त्रियांना पडते ज्यांच्यामध्ये रजोनिवृत्तीनंतर खूप मोठ्या प्रमाणात hot flushes चा त्रास होणे, किंवा रात्री प्रचंड प्रमाणात घाम येणे, त्यामुळे झोप न लागणे , त्वचा आणि योनीमार्गातील कोरडेपणा खूप जास्त वाढणे, आणि वैवाहिक जीवनातील स्वारस्य संपणे अशी लक्षणे आढळून येतात. तसेच हाडे ठिसूळ होण्याची लक्षणे लवकर दिसून आल्यास किंवा तशी शंका आल्यास त्यासाठी खबरदारी म्हणून देखील ह्या ट्रीटमेंटचा वापर करता येतो. परंतु *ही ट्रीटमेंट ज्या स्त्रियांना हृदय रोग, लिव्हर संबंधित आजार , रक्त गोठण्याच्या संबंधित आजार , किंवा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर भूतकाळात किंवा वर्तमान काळात आहे अशा स्त्रियांना देता येत नाही* . यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन्स ठराविक प्रमाणात ठराविक प्रकारे ठराविक मार्गातून पेशंटला दिले जातात. परंतु ज्या स्त्रियांचे गर्भाशय काही कारणास्तव काढून टाकण्यात आले आहे त्यांना केवळ इस्ट्रोजन हे हार्मोन दिले जाते. गोळ्या, क्रीम, जेल, स्किन पॅचेस, कॉपर टी सदृश गर्भपिशवीच्या आत मध्ये वापरण्याचे implant अशा अनेक विविध प्रकारात ही ट्रीटमेंट देता येते. परंतु यामुळे काही स्त्रियांना डोकेदुखी, मळमळ, अंगावर सूज येणे, पायांमध्ये गोळे येणे, पोट फुगल्यासारखे जाणवणे, स्तनांमध्ये दुखणे यासारखे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. परंतु तीन महिने नियमित HRT घेतल्यावर हे साईड इफेक्ट नाही से देखील होतात. या सर्व कारणांमुळे पाळी गेलेल्या स्त्रियांनी कोणत्याही हॉर्मोन्सच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नयेत.
G) पाळी गेलेल्या स्त्रियांनी दर एक वर्षाने *pap smear* ही तपासणी आणि दर दोन किंवा तीन वर्षांनी *मॅमोग्राफी* ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. गर्भपिशवीचा आणि स्तनांचा कॅन्सर होण्याचे प्रमाण या वयात सर्वाधिक असते त्यामुळे या दोन्ही तपासण्या त्याची पूर्वकल्पना आपल्याला देऊ शकतात. तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास नसला; आहार, जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य हे उत्तम स्थितीत असले तरीसुद्धा दर सहा महिन्यातून किमान एक वेळा रजोनिवृत्तीनंतर स्त्रीरोग तज्ञांकडून जाऊन त्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंतच्या दगदगीत आपली काळजी घ्यायला स्त्रियांना वेळ मिळालेला नसतो त्यामुळे शरीरावर बऱ्याच गोष्टींचे नकळत परिणाम झालेले असतात. या काळामध्ये कित्येक व्याधी अत्यंत उशिरा (लास्ट स्टेज वर असताना) लक्षात येतात त्यामुळे डॉक्टरांकडे दर सहा महिन्यातून एकदा जाऊन तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.
🔺हा लेख 40 वयोगटातील स्त्रिया वाचत असतील तर त्यांनी रजोनिवृत्ती साठी आत्तापासूनच तयारी करायला सुरुवात करावी.
🔺रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया जर हा लेख वाचत असतील तर तुमच्या शरीरात आणि स्वभावात घडणारे बदल हे अत्यंत नैसर्गिक असून त्यांना प्रेमाने आणि आनंदाने स्वीकारा आणि या क्षणापासून पुढचे जीवन उत्कृष्ट जगण्या चा संकल्प करा.
🔺आणि हा लेख वाचणाऱ्या सर्वांनी जास्तीत जास्त पुरुषांपर्यंत आणि घरातील तरूण वयात असलेल्या मुला-मुलींना पर्यंत हा लेख पोहोचविण्याचा प्रयत्न करा. कारण *रजोनिवृत्ती हा असा काळ असतो ज्यामध्ये स्त्री घरात खूप जास्त ग्रहीत धरली जाते आणि तिच्या शारीरिक आणि मानसिक बदलांकडे लक्ष द्यावे हे पूर्ण कुटुंबाच्या खिजगणतीत सुद्धा नसते*
धन्यवाद.
विशेष सूचना: माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा जो वयोगट मला मांडायचा आहे, तो माझा , म्हणजे 30 ते 40 वर्षाचा वयोगट आहे. उद्याच्या लेखामध्ये मी या वयोगटातील दुर्गे विषयी लिहून माझ्या लेखन मालेची सांगता करेल. आजचा भाग देखील तुम्हाला खूप उपयोगाचा वाटला असेल अशी आशा करते.
धन्यवाद.
©️डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn.
बार्शी.