मुंबई |
पृथ्वीतलावर माझ्या स्वतःच्या नावाचं एकही घर नाही. मी प्रामाणिकपणे कामावर भर देणारा माणूस आहे. त्यामुळं ईडीची चौकशी होत असताना तिला सामोरे जायला तयार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मांडली. नेर्ले (ता. वाळवा) येथील नंबर दोन सर्व सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “लोकांसमोर मान खाली घालायला लागेल, अशा प्रकारचं कृत्य माझ्याकडून आजपर्यंत झालेलं नाही. इथून पुढे देखील होणार नाही. सध्या जे चाललं आहे, त्याच्या विरोधी भूमिका आपण घेतोय. त्यांचं सरकार आहे, त्यांना जे करायचं ते करू देत. पृथ्वीतलावर माझं स्वतःचं घर नाही. सांगलीचं घर बापूंच्या नावावर होतं. ते आईच्या नावावर झालं. आता माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेतजमीन आहे. त्यात वाटणी झाली आहे. मी कोणाकडून पैसे घेतले नाहीत. त्यामुळं मला रात्री शांत झोप लागते.”