Latest Marathi News

BREAKING NEWS

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

0

भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था, सर्वधर्मसमभावाच्या मुल्यांची जपणूक करण्याचा निर्धार करुया
— विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त आवाहन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा

मुंबई, दि. 14 :- “विविधतेत एकता ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. ही ताकद अबाधित राखत भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था, सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार करूया”, असे आवाहन करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर शहिदांना श्रद्धांजली वाहिली असून देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या त्याग, बलिदानाबद्दल तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे म्हणतात की, भारत देश भौगौलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधतेने नटलेला, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, लोककला, लोकसंस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेला समृद्ध देश आहे. देशाची विविधता हीच देशाची खरी शक्ती आहे. सर्व जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांतांच्या बांधवाना सोबत घेऊन सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्याला घडवायचा आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं. भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच, देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणं, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.