भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई |
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, भारताच्या संविधानामुळे सर्वांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळतात. त्याचे श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे केलेले काम हे अत्यंत मोठे आहे. भारत घडविण्यात डॉ.बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.