सोलापूर |
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 17 डिसेंबर शनिवारी सकाळच्या सुमारास सापळा रचून सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून नैसर्गिक ताडी वापरून त्यामध्ये विविध केमिकलयुक्त पदार्थ टाकून कृत्रिमरित्या भेसळयुक्त ताडीची निर्मिती करीत असतांना 10 लोकांना ताब्यात घेतले.तसेच सदर ताडी केंद्र चालवणारे भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत उदगिरी यांच्या बंगल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मुद्देमाल जप्त केला.छापा मारलेल्या ताडी केंद्रावर एका 3000 लिटर क्षमतेच्या निळ्या रंगाच्या टबमध्ये व एका 1000 लिटर क्षमतेच्या काळ्या रंगाच्या टबमध्ये बनावट ताडीचा साठा तयार केला जात असल्याचे दिसून आले.तसेच त्याठिकाणी 50 लिटर क्षमतेच्या 29 कॅनमध्ये शुद्ध ताडी व 30 प्लास्टिक कॅरेटमध्ये 650 मिलीलिटर क्षमतेच्या ताडीने भरलेल्या 360 बाटल्यांचा साठाही आढळून आला.यासह सदर गुन्ह्यात रिकाम्या काचेच्या बाटल्या,प्लास्टिक कॅरेट,प्लास्टिक टब,बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व इतर साहित्य तसेच एक महिंद्रा बोलेरो त्याचा क्रमांक MH13 DQ 2846,एक होंडा शाईन मोटरसायकल,दोन एक्टीवा स्कूटी आदी जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये 12 लाख 17 हजार 234 रुपये इतकी आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी शिवय्या राजय्या तांडा,माणिकगौड शंकरगौड पोगुल,बादास नरसप्पा बिच्चल,आकाश दत्तात्रय माने,अंबादास सिद्राम इदनुर,मदन मोहन पात्रे,रोहन सुधाकर जगताप,विकास दत्तात्रय माने,अंबादास दिगंबर जगताप आणि भाजपच्या माजी नगरसेवकाचा मुलगा नरेंद्र लक्ष्मीकांत उदगिरी याला अटक करण्यात आली आहे.परंतू राज्य उत्पादन शुल्क विभागाने आरोपीसह काढलेल्या फोटोमध्ये केवळ नऊच आरोपी दिसत आहेत.दहावा आरोपी हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असून तो सदरील फोटो मध्ये दिसून येत नाही.राजकीय दबावामुळे त्याला या फोटोतून वगळण्यात आले आहे काय? अशी उलटसुलट चर्चा सध्या नागरिक करित आहेत.या दहाही आरोपींना 18 डिसेंबर रोजी दारुबंदी न्यायालया समक्ष हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना एका दिवसाची एक्साईज कस्टडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संभाजी फडतरे,सदानंद मस्करे,दुय्यम निरिक्षक सुरेश राजगडे,अंकुश आवताडे,सुरेश झगडे,सुनिल पाटिल,गणेश उंडे,पुष्पराज देशमुख,सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण,गजानन होळकर,सिद्धराम बिराजदार,जवान प्रियंका कुटे,अनिल पांढरे,प्रकाश सावंत,प्रशांत इंगोले,इस्माईल गोडीकट,चेतन व्हनगुंटी व वाहनचालक रशिद शेख,रामचंद्र मदने,संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ताडी व इतर केमिकल पदार्थांचे नमूने काढण्यात आले असून रासायनिक लॅबोरेटरीकडे चाचणीकरीता पाठविण्यात येत आहे.बनावट ताडीच्या खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत असून मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.