पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूरच्या निर्मात्याची बाजी ; सोलापूरचे गणेश शिंदे यांची निर्मिती असलेल्या ‘गिरकी’ चित्रपटाला दिग्दर्शनाचा पुरस्कार
पुणे |
पुण्यामध्ये दरवर्षी भरणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा अधिकृत फिल्म फेस्टिवल असलेल्या पिफ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा सोलापूरच्या गणेश शिंदे निर्मित आणि कविता दातीर, अमित सोनावणे दिग्दर्शित ‘गिरकी’ या मराठी चित्रपटाला ‘स्पेशल मेन्शन बेस्ट डिरेक्टर’ म्हणून गौरवण्यात आले आहे. वर्षभरात तयार झालेल्या मराठी चित्रपटांपैकी निवडलेल्या सात चित्रपटांतून ही निवड झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन व सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सोबतच इतरही अन्यही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपट अध्यापक समर नखाते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते. अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेता स्वप्नील जोशी यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

पिफ मधील मराठी चित्रपटांच्या स्पर्धेला डॉमनिक लॉशेर (स्वित्झरलँड येथील फिल्ममेकर), मॅरिटा हॉलफोर्स (फिनलँड येथील सिनेमॅटोग्राफर) व पी. शेषाद्री (कन्नड फिल्ममेकर) या तिघांनी ज्युरी म्हणून काम सांभाळले. “निर्मात्यांची साधी व स्पष्ट दृष्टी, तसेच आधुनिक व पारंपारिक मूल्यांमध्ये अडकलेल्या तरुणाईचे त्यांनी केलेले चित्रण हे कौतुकास पात्र आहे,” असे मत ज्युरींनी मांडले.
गिरकी हा ९५ मिनिटे लांबीचा चित्रपट असून या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू सोलापूरच्या गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. गणेश शिंदे हे मूळचे सोलापूरमधल्या माढा तालुक्यातल्या लोंढेवाडी गावाचे. सध्या ते सोलापूर शहरात संजय गांधी नगर येथे वास्तव्यास आहेत. अण्णासाहेब पाटील प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. विजापूर रोड येथील शासकीय तंत्रनिकेतन आयटीआय येथून महाविद्यालयीन शिक्षण झाले. पुण्यात ‘परफेक्ट ग्रुप’ नावाची त्यांची कंपनी असून प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनच्या हाय स्पीड कस्टमाइज्ड सॉर्टरचे उत्पादन करणारे ते भारतातले एकमेव उद्योजक आहेत. चित्रपट हा त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून ‘गिरकी’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मितीक्षेत्रात प्रवेश केला आहे. पहिलीच निर्मिती असलेल्या गणेश शिंदे यांच्या ‘गिरकी’ या चित्रपटाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्पर्धेत अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हाही चित्रपट या स्पर्धेमध्ये होता.