पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई |
पुणे शहरासह परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात गेल्या काही वर्षात बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रहिवासी प्रकल्पांसह काही कमर्शिअल प्रकल्पसुध्दा कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पातून प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. या सांडपाण्यामुळे धरणांतील पाणी प्रदुषित होते, धरणातील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने ताताडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक धरणे पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील या धरण परिसरात अनेक लोक सेकंड होम तसेच रिसॉर्ट उभारत आहेत. गेल्या काही दिवसात अशा प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकल्पांमधुन प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. हे सांडपाणी पुणे शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, चासकमान, भामा-आसखेड या धरणातील पाण्यात मिसळून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. धरणातील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकाससह संबंधित खात्यांचा समन्वय करत राज्य शासनाने तातडीने ठोस कार्यक्रम राबविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.