Latest Marathi News

BREAKING NEWS

न्यूयॉर्कमध्ये इंडिया डे परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तिरथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

0

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनीच्या निमित्ताने न्यूयॉर्क शहरात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इंडिया डे परेड मध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तिरथ सर्वांचे लक्ष वेधून गेला. छत्रपती फाऊंडेशन, न्यूयॉर्क यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या या रथाने इतिहास, संस्कृती आणि शौर्याची प्रेरणादायी झलक मॅडिसन अव्हेन्यूवर उभी केली.

या कीर्तिरथात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळे यांची सजीव रूपे बालक, महिला आणि युवकांनी सादर केली. भव्य पोशाख, वेशभूषा आणि दमदार अभिनयाच्या जोरावर रथाने उपस्थित प्रेक्षकांना इतिहासात डोकावण्याची संधी दिली.

रश्मिका-विजय देवरकोंडाची उपस्थिती

परेडचे ग्रँड मार्शल म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री रश्मीका मंदाना आणि अभिनेता विजय देवेरकोंडा यांनी सहभाग घेतला. तर विशेष अतिथी म्हणून मिशिगन येथील US हाऊस ऑफ रेप्रेसेंटेटिव्ह्जचे खासदार ठाणेदार उपस्थित होते. त्यांनी कीर्तिरथावरून उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला अभिवादन करत परेडचा आनंद घेतला.

दिव्य रथ, दिमाखदार कार्य

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी परेडचे औपचारिक उद्घाटन केले. तर भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत श्री. बिनया प्रधान यांनी कीर्तिरथाचे विशेष कौतुक करत छत्रपती फाऊंडेशनच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. “रथ दरवर्षीच भव्य असतो, पण यावेळी त्यामागील कार्य अधिक दिमाखदार आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

५० हून अधिक वादकांसह जल्लोश ढोल-ताशा पथकाने संपूर्ण न्यूयॉर्क शहर दणाणून टाकले, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यदिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीच्या मुलींनी लेझीम आणि पारंपरिक नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सर्व सांस्कृतिक सादरीकरणांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतील लोकांना मिळाला.

१०० हून अधिक सहभागी कलाकारांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या लोककला, इतिहास आणि परंपरेचे दर्शन घडवत न्यूयॉर्कच्या मॅडिसन अव्हेन्यूवर भगव्या रंगाने सजलेली शान निर्माण केली. New York Parade Life या प्रतिष्ठित वृत्तपत्राने कीर्तिरथाला Best Float असा बहुमान दिला असून, “शिवराज्याचा लोकशाहीशी असलेला सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणारा रथ” अशी दाद दिली आहे.

छत्रपती फाऊंडेशन, न्यूयॉर्क ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी संस्थेने भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन करत अमेरिकेतील भारतीय समुदायात अभिमानाचा ठेवा वाढवला आहे.

परेडचे यशस्वी आयोजन फेडेरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स यांच्यावतीने करण्यात आले. छत्रपती फाऊंडेशनच्या १० राज्यांतून आलेल्या सदस्यांनी मेहनतीने या रथाचे नियोजन केले. त्यांच्या समवेत जल्लोश ढोल-ताशा पथक आणि रुद्र डान्स अकॅडमी यांचेही विशेष योगदान राहिले. या दिमाखदार उपस्थितीमुळे आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेड एक अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळा ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.