मुंबई |
भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुभवली. आपल्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमांतर्गत युद्धनौकेस भेट देण्याचा उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला होता. यावेळी विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. आपल्या जवानांच्या सामर्थ्यांची, युद्ध कौशल्याची तसेच त्यांच्या अतिशय खडतर जिवनमानाची लोकप्रतिनिधींना ओळख व्हावी, आणि आपल्या जवानांप्रती सर्वांमध्ये आदराची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून ‘एक दिवस समुद्रावर’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
नौदलाचे सामर्थ्य, त्याचे युद्ध कौशल्य आणि दैनंदिन जीवनमान याचा प्रत्यक्ष अनुभव चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी नौदलातील जवानांनी आपल्या विविध युद्ध नौकेवर सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके, हेलिकॉप्टर ऑपरेशन, एअरक्राफ्ट कॅरिअर आदी पाहून आपल्या जवानांप्रती स्वाभिमान वाटला. आपल्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत, या भावनेने त्यांच्या प्रतीचा आदर शतपटीने वाढला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, नौदलाचे कार्य पाहून आपला देश सुरक्षीत हाती आहे याची खात्री पटली आहे. नौसैनिकांचे कामकाज प्रेरणादायी आहे. कुटुंबापासून दूर राहून नौसैनिक काम करतात. देशाच्या संरक्षण सज्जतेत त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. नौसेनेसमवेत ‘एक दिवस समुद्रावर’ हा उपक्रम सर्वसामान्य नागरीकांसाठीही राबविण्यात यावा. यामुळे लोकांनाही लष्कराच्या कामकाजाची, सैनिक घेत असलेल्या कठोर परिश्रमाची आणि देशाप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाची प्रत्यक्ष माहिती घेता येईल. आजच्या दौऱ्यामुळे नौसेनेच्या कामातून मोठी प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.
‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमांतर्गत युद्धनौकेस भेट देण्याच्या या उपक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, माजी मंत्री जयकुमार रावल, महादेव जानकर यांच्यासह भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. स्वामिनाथन, रेअर ॲडमिरल महेश सिंह, नौसेनेच्या पश्चिम बेड्याचे कमांडींग ऑफिसर समीर सक्सेना आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.