Latest Marathi News

BREAKING NEWS

नागरिकांची कर्तव्य तत्परता व जबाबदार प्रशासन यातच नदी व पर्यावरणाच्या संतुलनचा मार्ग – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

0

नांदेड |

नदीच्या काठावर वसलेली नगरे आपल्या सांस्कृतिक विरासतीचा भाग आहेत. निसर्गाकडून आपण आपला भवताल व पर्यावरणबाबत खूप काही शिकत आलो. मात्र आजवर आपल्या वागण्यातील, रोजच्या वर्तनातील, उपयोगात घेतलेल्या व निसर्गाला हानी पोहोचविणाऱ्या असंख्य गोष्टींमुळे आपला भवताल व नदीच्या आरोग्य धोक्यात आले आहे. यातून नदीला, पर्यावरणाच्या असमतोलाला सावरण्यासाठी नांदेड येथे नागरिकांचा जबाबदार गट सतत कार्यरत आहे याचे मला विलक्षण कौतुक आहे. ज्या तळमळीने महिन्यातील ठराविक दिवस आपण नदी स्वच्छतेसाठी देत आहात त्यात मी माझा सहभाग आनंदाने देऊन आपल्या सोबत कार्यरत राहीन या शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गोदावरी नदी घाट स्वच्छता उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, दिपक मोरताळे, संतोष मुगटकर, प्रा. डॉ.परमेश्वर पौळ, हर्षद शहा, डॉ राजेश माने, राजीव जैन, गणेश बोडके, बापू किनगावकर, चंदा काबरा, शांता काबरा, प्रदीप जैन, नीरज अवस्थी, श्री. ढगे, प्रा. डॉ. महावीर घंटे, धनंजय नलबलवार आदी यावेळी उपस्थित होते.

वृक्षमित्र फाउंडेशन, नागरी कृती समिती, गोदावरी नदी संसद, परम विश्व फाउंडेशन, शांतीधाम सेवा प्रतिष्ठान, अखिल भारतीय विध्यार्थी परिषद, भारतीय जैन संघटना, नांदेड प्लॉगर्स ग्रुप, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, माँ गोदावरी स्वच्छता अभियान ग्रुप, नंदीग्राम गो सेवा संघटन यांच्या सहयोगातून आज बंदाघाट नदीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी बंदा घाट येथे आयोजित चला जाणू या नदीला या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संवाद साधला.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांकडून जी जबाबदारीचे, कर्तव्य तत्परतेची अपेक्षा व्यक्त केली आहे ती आपण प्रत्येकाने देशसेवेच्या माध्यमातून पूर्ण केली पाहिजे. नदी, नदीचे आरोग्य पर्यावरणातील असमतोल, प्रदूषण, अस्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेमुळे होते असे नाही. नियमांचे काटेकोर पालन नागरिकांकडूनही अपेक्षित आहे. जोपर्यंत शासनासमवेत समाज जोडला जाणार नाही तोपर्यंत बदलाच्या अपेक्षा व्यक्त करणे उचित नाही असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.

मानवी जीवनातील स्वच्छतेसाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. प्रत्येक व्यक्तीमागे दररोज किमान 40 मिलिग्रॅम रसायन गृहीत धरले तरी नांदेड सारख्या महानगरातील लोकसंख्या गृहीत धरले तर हे गणित वर्षाला 9 हजार टनापेक्षा अधिक होते. हेच रसायन सांडपाण्यावाटे नदीला येऊन मिळते. नदी याने प्रदूषितच नव्हे तर मृत व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या नद्या शेवटच्या घटका मोजत असून याला सावरण्यासाठी चला जाणूया नदीला सारख्या चवळीची नितांत आवश्यकता असल्याचे दीपक मोराळे यांनी सांगितले.

समाजातील सर्वच घटक या चळवळीत सक्रिय सहभागासाठी तत्पर असून आजचा हा विविध संघटनांचा सहभाग त्याचेच प्रतिक आहे. भारतीय जैन संघटना नांदेडसाठी वेगळे योगदान देण्यास तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चळवळीत युवकांचा वाढत जाणारा सहभाग हा सर्वांचा उत्साह द्विगुणित करणारा आहे. त्यांना योग्य दिशा मिळाली तर ही चला जाणू या नदीला ही चळवळ दिशादर्शक असेल असा विश्वास पर्यावरण तज्ञ डॉ परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.