पुणे |
राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागिण विकासासाठी बांधील आहे. त्यामुळे इतर घटकांप्रमाणे दिव्यांगांसाठी राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
पाटील म्हणाले, की शासनाने अपंग कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती केली आहे. त्यामुळे अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करून दिव्यांगाचा सर्वागिण विकास करण्यात येईल. अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांतून अपंगही कुठे कमी नाहीत असा संदेश समाजासमोर आला आहे. त्यामुळे अपंग मुलामुलींचे मनोबल वाढेल.
अपंगांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे अपंगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच नवीन अनुभूती त्यांना मिळाली आहे. ही अनुभूती त्यांच्या जीवनात कायम राहील. अशा स्पर्धातून राज्य पातळीवरचे खेळाडू तयार होऊन देशपातळीवर निश्चित राज्याचे आणि देशाचे नाव उजळवतील. भविष्यात दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येतील असे पवार यांनी नमूद केले.