मुंबई |
एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे गटावर निशाना साधला होता. त्यात त्यांनी ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!’ असे लिहिले होते.
आदित्य ठाकरे यांच्या याच ट्वीटवर बोलताना खोके या शब्दाचा समाचार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत घेतला आणि गंभीर आरोप करत टीका केली. “ज्यांना खोक्याची सवय असते तेच सतत खोके खोके करत असतात. शिवसैनिक हा वडापाव खाऊन जगतो. फाईव्ह स्टार हॉटेलात जाणारे खोक्यांची भाषा करतात. ज्यांना खोक्यांची सवय असते, तेच सतत खोके खोके करत आहेत” असा घणाघात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केला.