- अर्जुन गोडगे
पोरांची वय होऊन गेली, पण काही पोराची लग्नंच होत नाहीत. खेडोपाडी बिनलग्नाच्या पोरांच्या टोळ्यांच्या टोळ्या आहेत. परिस्थिती अजून काही काळ अशीच राहील, असे जुनी-जाणती लोकं मानत आहेत. खरंतर ही वाईट वेळ आमच्या पिढीवर आली आहे. लाखो रुपये किमतीच्या जमिनीचा मालक, उच्चशिक्षित असला तरीही त्याच्याशी लग्नगाठ बांधायला कुणी तयार होत नाही. लग्नासाठी मुलीवाले नोकरीवाल्यांचा शोधात आहेत. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठविले; पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. ‘शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई,’ अशी स्थिती. शेतकरी नवरदेव असल्यास मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवितात तसेच गरिबातील गरीबही नोकरीवाला नवरदेव मिळावा, असा अट्टाहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्नगाठी बांधण्याची जुळवाजुळव सुरु होऊन लग्नसराईला सुरुवात होते. सनई चौघड्याचे सूर वाजण्याला सुरुवात होते. सर्वत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीजणांचे जमले तर ते साखरपुड्यातच लग्न उरकून टाकण्याला मागे पुढे पाहत नाहीत. लग्नगाठी जमविताना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारण प्रत्येकाने स्थळ हे नोकरदाराचेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना कमी पसंती दाखवू लागले आहेत. सगळेच शेतकरी असलेल्यांना नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल, असे अनेकजण म्हणतात.
शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. संसार करण्यासाठी इतके उत्पन्नही पुरेसे असते. जे तरुण शेती करतात, त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या तरुणपिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. तरुणांनी शेती करणं सोडून दिले. दरवर्षी २० लाख तरुण शेती (कॅगच्या अहवालानुसार) सोडून पर्यायी मार्गाकडे वळत आहेत, अशी आकडेवारी आहे. हा आकडा भविष्यात आणखी वाढेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सगळ्यात वाईट परिस्थिती जर कोणाची असेल तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पोरांची. वाढतं वय आणि आयुष्याची वाया घालवलेली ऐन उमेदीची वर्षे. ज्यांना नोकरी मिळाली त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना नोकरी लागत नाही त्यांनी काय करायचे? हा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. अंदाजित आकडेवारीनुसार १० लाखांपेक्षा जास्त पोरं रात्रंदिवस मेहनत करून जर हाती काहीच येत नसेल तर ही परिस्थिती मिटणार कशी, हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा राहतो. शेवटी वय वाढलेले असते, खिशात पैसे नसतात, लग्न जमत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायाला भांडवल नाही, घरच्यांना काय उत्तर द्यायचे,पाहुणे मंडळी काय विचार करतील, गावात लोक काय म्हणतील असे अनेक प्रश्न उभे राहतात.
एवढं अपयश हातात घेऊन हे भावी अधिकारी जेव्हा गावाकडे येतात, तेव्हा नैराश्य असते. एके काळी खूप मोठी, खूप होती आता फक्त धूसर आशा आहे, राखरांगोळी झाली सगळ्याची तरीही मला धूसर आशा आहे.. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या या नुकसानीला जबाबदार कोण? त्याची कारणे काय? दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत आहे, पण जागा वाढत नाहीत. स्पर्धा परीक्षार्थीच्या पैशांवर क्लासेस, पुस्तक लेखक, विक्रेते, झेरॉक्सवाले, हॉस्टेल, लायब्ररी, हॉटेल, चहावाले, मेसवाले, रद्दीवाले एवढंच कशाला श्रीमंत होत आहेत; पण उमेदवारांना काय मिळते? आणि कधीकाळी आयोगसुद्धा देशाच्या लोकसंख्येच्या विस्फोटावर पानभर निबंध लिहणाऱ्या वर्गाला बेरोजगारीच्या विस्फोटाची उशिरा का लागते? चाहूल महाराष्ट्रातील फार मोठी बेरोजगारी स्पर्धा परीक्षा या क्षेत्राने लपवून ठेवली आहे. त्यावर कधी ना कधी. कुणाना कुणाला बोलावेच लागणार आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या भावा- बहिणींना स्वप्नांच्या दुनियेतून व्यावहारिक जगात आणावेच लागणार आहे. माझा प्रयत्न तोकडा आहे, जे आहे ते मनातून बोलतोय, तरीही कोणाचे मन दुखावले असेल माफी मागतो, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या…