मुंबई |
पुणे शहरालगत पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या खडकवासला रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करण्यात यावे. हा रस्ता टिकाऊ, दर्जेदार होण्यासाठी संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे. खडकवासला धरणाजवळच्या अपघातप्रवण क्षेत्रातील चौपाटी परिसरात संरक्षक भिंत उभारण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, पुणे शहरालगत असलेला सिंहगड, खडकवासला धरणाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत. आठवडा आणि सार्वजनिक सुट्टीला पर्यटक या स्थळांना भेट देत असतात. खडकवासला रस्ता वाढत्या वाहतुकीसाठी अरुंद असून तिथं कायम वाहतूककोंडी होते. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व्हावे. रस्ता टिकाऊ, दर्जेदार करण्यासाठी तो पूर्णपणे काँक्रीटचा करण्यात यावा. खडकवासला धरणाजवळ अपघातप्रवण चौपाटी परिसरात संरक्षक भिंत उभारण्यात यावी. हे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली.