कोकण रेल्वे सल्लागार समितीच्या संचालकपदी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, यांच्यासह आशिष पेडणेकर यांची निवड
मुंबई |
भारत सरकारच्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रेल्वे सल्लागार समितीवर (KRUCC) संचालकपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि महाराष्ट्र चेंबरचे ट्रस्टी आशिष पेडणेकर यांची महाराष्ट्र राज्यातून समितीवर निवड झाली आहे.
रेल्वे मंत्रालयाने श्री. ललित गांधी यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड केली आहे. कोकण रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीवर (KRUCC) ते संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत या निवडीचा कार्यकाळ आहे. त्याबाबतचे निवडीचे पत्र कोकण रेल्वेचे सचिव एन. एम. तेलंग यांनी त्यांना प्रदान केले आहे. कोकण रेल्वेच्या स्थापनेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरचा मोठा पुढाकार आहे.
या समितीत चार राज्यातून राज्यसभा आणि लोकसभेचे प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, समितीवर आहेत.
दरम्यान ललित गांधी यांनी केंद्र आणि राज्यस्तरीय रेल्वे विभागातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन रेल्वेचे जाळे अधिकाधिक दृढ करण्यास आणि विविध मार्गावर सेवा देण्यासाठी प्रयत्न करुन यश मिळविले आहे. रेल्वे प्रवासी ते रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने ते प्रयत्नशील राहिले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊनच रेल्वे मंत्रालयाने त्यांची समितीवर निवड केली आहे. त्यांच्या या निवडीचे व्यापारी, उद्योग क्षेत्रासह सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे