बार्शी |
बार्शी तालुक्यातील उक्कडगावचे सुपुत्र आणि भारतीय नौदलात सेवेत असलेले जवान अनिल उर्फ उमेश सुनिल सानप यांचे अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरुन ते प्रवास करत असलेल्या खासगी वाहतुकीच्या एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते ३० वर्षांचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि. १९ रोजी सकाळी मूळ गावी उक्कडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी,भाऊ आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे.

अनिल उर्फ उमेश सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते. मात्र, पुण्याहून परत जाताना ते प्रवास करत असलेल्या गाडीचा अपघात होऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. तेव्हा, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्यावेळी, सुनिल हे मुंबईतून येऊन वडिलांची काळजी घेत. दुर्दैवाने वडिलांच्या विमा अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी आल्यानंतर अपघातातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
२०१२ मध्ये नेव्ही मध्ये भरती झालेले अनिल हे सध्या INS कोची (मुंबई )येथे नेमणुकीवर होते.उमेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी नौदल जवानांचे पथक आज उक्कडगाव येथे आले होते.त्यांची फुलाने सजवलेल्या वाहनातून गावातून मिरवणूक काढण्यात आली. देशभक्ती पर गीते गात आणि अमर रहे अमर रहे शहिद जवान अमर रहे च्या घोषणा देण्यात येत होत्या. सरस्वती विद्यामंदिर मधील विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सानप यांनी ओरिसा,विशाखापट्टण, लोणावळा(आय एन एस)याठिकाणी सेवा केली आहे.

मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नेव्हीचे अधिकारी भरत, मयूर कोल्हे,लक्ष्मण सिंग, उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल, तहसीलदार सुनील शेरखाने, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत,पांगरीचे सपोनि नागनाथ खुणे, सरपंच सविता घुले, उपसरपंचगणेश हगवणे, पोलीस पाटील नितीन वाघमारे उपस्थित होते.
शालेय व माध्यमिक शिक्षण बार्शीतच
अनिल सानप यांचे प्राथमिक शिक्षण पांगरीत झाले असून खासगांव येथील आश्रम शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले होते, त्यानंतर, श्रीमान झाडबुके महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान, सन २०१२ मध्ये ते भारतीय नौदलात भरती झाले होते. गेल्या १० वर्षांपासून ते भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत होते.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मानाचा तिरंगा त्यांची पत्नी सविता सानप व लहान मुलगा अंशुमन यांच्याकडे सुपूर्द केला.