अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यासाठी तातडीनं बैठक घ्या ; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुणे |
पुणे – बंगलोर महामार्गावरील नवले पुलावर काल भीषण अपघात घडला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला हा कंटेनर भरधाव वेगाने येत असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर समोर येईल ते वाहनांना धडक देत पुढे गेला. यामध्ये एक – दोन नव्हे तर तब्बल ४७ गाड्यांचे नुकसान झाले असून या अपघातात पन्नासहुन अधिक लोक जखमी झाले आहेत. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले. नर्हे नजीक परिसरात अपघात घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या भीषण अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान झाले आहे. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने या अपघातात अद्याप जीवितहानी झाली नाही.
या अपघाताची बातमी वाऱ्या सारखी पसरली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या अपघाताची गंभीर दखल घेत तात्काळ मदतकार्याबाबत सूचना दिल्या होत्या. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यासाठी तातडीनं, आजच बैठक घेण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचे पाटील यांच्या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
पाटील यांच्या आदेशा नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून लवकरच या अपघाताच्या घटनेचा अहवाल आणि काय उपाय योजना होऊ शकतात यासंबंधी आराखडा अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात येणार आहे.