श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न
मुंबई : मुंबई येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठाचा ७५ वा वार्षिक दीक्षांत समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला. या भव्य समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थितीत होती.
या प्रसंगी लोकसभा माजी अध्यक्षा सौ. सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरेट पदवीधारकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. विद्यार्थ्यांना उत्तम व्यक्ती घडवणारे आणि जीवनात यशस्वी करणारे शिक्षण असले पाहिजे. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी विविध क्षेत्रात नवीन संशोधन केले पाहिजे. ज्या क्षेत्रांत आपण आयातीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रात नवीन संशोधन करून भविष्यात त्या क्षेत्रात निर्यात वाढवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या की, ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने महिलांसाठी शिक्षणाचे विविध मार्ग खुले करून दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक संकटांवर मात करून जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्य केले, त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले पाहिजे. या कार्याचा सन्मान होत असल्याचा अभिमान आहे. असे सांगून त्यांनी महर्षी कर्वे यांच्या सामाजिक कार्याचीही आठवण करून दिली.
या सोहळ्यास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव विलास नांदवडेकर, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.