राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुणे महानगरात भव्य पथसंचलनाचे आयोजन… संघ स्वयंसेवक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संचलनात सहभाग
पुणे, ०२ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरच्या विजयादशमी उत्सवाचा प्रारंभ परंपरेनुसार छत्रपती शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रांगणातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यंदा संघशताब्दीच्या औचित्याने ऐतिहासिक असलेल्या या सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना संघ स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. एसएसपीएमएस मिलिटरी स्कूलच्या मैदानावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि घोष मानवंदना देत या संचलनाची सुरुवात झाली.
विजयादशमी उत्सव प्रारंभप्रसंगी संघाचे अखिल भारतीय शारीरिक प्रमुख जगदीशजी प्रसाद, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, प्रांत सहकार्यवाह महेश करपे, महानगर कार्यवाह सचिन भोसले यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ एक स्वयंसेवी संघटना नाही तर ती एक जीवनपद्धती आहे, राष्ट्र चेतनेला जागवणारी आणि समाजाला संघटित करणारी एक अखंड चळवळ आहे. संघाचा प्रत्येक उत्सव हा केवळ एक कार्यक्रम राहत नाही, तर त्यातून देशभक्ती, शिस्त, आत्मभान आणि समाजहिताची ऊर्जा पिढ्यान् पिढ्या पुढे सरकत राहते.