सोलापूर : विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी नवीन शिक्षण प्रणाली अमलात आणून मुलींसाठी शुल्क माफी करण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वालचंद महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता सोळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते.
यावेळी सोलापूर येथील वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष व मानद सचिव डॉ. रणजीत गांधी, वैभव गांधी, आई प्रतिष्ठानचे संस्थापक व सोलापूरचे ज्येष्ठ समाजसेवक मोहन डांगरे, वालचंद शिक्षण समूहाचे खजिनदार भूषण शहा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. जेणेकरून ती जिथे कुठे असेल तिथे सुरक्षितच राहायला हवीत. मुलींना शिक्षणात प्राधान्य दिले तरच त्या पुढे येऊन शकतील. यासाठी सरकारने मुलींसाठी शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफ केली त्यांचे शिक्षणाचा खर्च 100% पूर्णपणे माफ केला आहे. नवे शैक्षणिक धोरण त्यांना विकसित करेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाच लाख मुलींना दरमहा दोन हजार रुपये कमवा व शिका या माध्यमातून देण्याचे ठरवले आहे. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पसमध्ये कमवा व शिकाद्वारे उद्योग निर्मिती करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
वैभव गांधी यांनी प्रास्तावित केले. वालचंद संस्थेने केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. प्रारंभी वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.